श्री गणेशाय नम: । हे अरूपा निराकार । भक्तांसाठी होतो साकार । जागे करतो वारंवार ॥ १ ॥ आम्ही निद्रेत असणार । तू जागृत करणार । तुला कोण विसरणार ? । विसरणारा निद्रेत रहाणार ॥ २ ॥ आनंदाचा ठसा मनावर । हेच जीव मागणार । जो जागृत असणार । तोच आनंदित रहाणार ॥ ३ । तूच आनंद देतोस आम्हांस । जो जे काही देतो दुसर्यास । कोण विसरणार त्यास ? । हे कळते गणामहाराजास ॥ ४ ॥ जेणे तुला आळवतो । तूच सदा प्रसन्न होतो । तू जे जे सांगतो । ते ते भक्तां सांगतो ॥ ५ ॥ माझी तुला एक आर्जव । भक्तांसाठी घ्यावी धाव । संतोषेल भक्तांचा जीव । आनंदेल माझा जीव ॥ ६ ॥ नुसते दृष्टीने बघण्यास । नको शिकवू आम्हांस । अंतर्मनाने जाणण्यास । शिकव तू आम्हांस ॥ ७ ॥ जे दृष्टी न बघणार । ते तू बघणार । हे मी जाणणार । कैसा तुला विसरणार ? ॥ ८ ॥ तू यावे ह्या स्थाना । माझी वृत्ती स्थीर करण्या । उपयुक्त ग्रंथ लेखना । हीच मनोमन प्रार्थना ॥ ९ ॥ जैसी मी भाकतो करूणा । माझा हेतू पूर्ण करण्या । तैसे भक्त समर्थांना । भाकत होते करूणा ॥ १० ॥ अकोल्याचा बच्चुलाल । संस्काराने सुशील । पावित्र्याची वाटचाल । गुरू पूजनाची तळमळ ॥ ११ ॥ बच्चुलाले केली विनवणी । समर्थ सद्गुरूंनी । यावे माझ्या सदनी । गुरूपूजन हेतू मनी ॥ १२ ॥ समर्थे हेतू जाणून । स्विकारले आमंत्रण । त्यांस होकार देऊन । दिला त्यास परतवून ॥ १३ ॥ महाराज गेले अकोल्याला । बच्चुलालच्या सदनाला । आनंद झाला मनाला । हेतू पूर्ण झाला ॥ १४ ॥ पूजाविधी सुरू झाले । समर्थांस उटणे लावले । उष्णोदक स्नान घातले । जरीचा पितांबर नेसवले ॥ १५ ॥ शालीचेही प्रयोजन केले । फुलहार गळ्यात घातले । केशरी चंदन भाळी लावले । नाना अलंकार घातले ॥ १६ ॥ दहा बोटात दहा अंगठ्या । रत्नजडीतास नव्हता तोटा । वामकरी पौचा घालता । शोभून दिसे सद्गुरूनाथा ॥ १७ ॥ अष्टगंध अर्गजा अत्तर । लावले होते बाहुंवर । गुलाबपाणी अंगावर । घमघमाट सुगंध फार ॥ १८ ॥ जिलबी राघवदास पेढे । प्रसादात पुढे ठेवले । तबकात ठेवले विडे । रंगावलीने शोभा वाढे ॥ १९ ॥ वैभवाचे प्रदर्शन केले । सारे विपरित झाले । महाराजांस न रुचले । भाव चेहेर्यावर उमटले ॥ २० ॥ ज्याला जे आवडते । ते त्यास देण्याते । त्याचे मन संतुष्ट होते । कृपाशिष मिळते ॥ २१ ॥ दागदागिने भिरकावले । कृतीतून बोलके झाले । बच्चुलाला जागृत केले । वैभवास न भुलले ॥ २२ ॥ योग्याचे अंतरंग जाणावे । फाजील प्रदर्शन नसावे । ऐसे त्यास अर्पण करावे । जेणे त्याने संतुष्ट व्हावे ॥ २३ ॥ प्रसंग विपरित घडला । अपेक्षाभंग झाला । बच्चुलालास पस्तावा झाला । चूक स्वतःची जाणता झाला ॥ २४ ॥ महाराज वदले त्यास । मला काय पोळ्याचा बैल समजतोस ? । नाना अलंकार घालतोस । माझी परिक्षा पाहतोस ? ॥ २५ ॥ मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्याचा । काही न उपयोग दागदागिन्यांचा । योगी भुकेला सेवेचा ॥ २६ ॥ बच्चुलाल नतमस्तक झाला । विनवणी करू लागला । चूक कळली मला । पुन्हा न होणार प्रसंगाला ॥ २७ ॥ गुरू मला माफ करा । माझ्यावर कृपा करा । शुद्ध भाव अंतरा । झिडकारू नका अलंकारा ॥ २८ ॥ राममंदिर बांधण्याची । ईच्छा माझ्या मनाची । आहे कित्येक दिवसांची । ती पूर्ण करा साची ॥ २९ ॥ भक्तीरसाने ओथंबलेले । बच्चुलालाचे हृदय जाणले । समर्थांचे हृदय द्रवले । त्यास आशिर्वाद दिले ॥ ३० ॥ त्याचे पुढचे संकट टळले । महाराज कृपावंत झाले । अकोल्याहुन निघाले । शेगावास परतले ॥ ३१ ॥ पितांबर न सोडे समर्थांस । जैसे तान्हुले मातेस । सदा तत्पर सेवेस । काही न उणीवेस ॥ ३२ ॥ सदा त्यांच्या सान्निध्यात । सदा त्यांच्या पुढ्यात । गुरू वेडा अंतरंगात । दिसत होते त्यांच्या कृतीत ॥ ३३ ॥ विचार प्रत्येक मातेचे । एकच असतात तिचे । सदा हित तान्हुल्याचे । हेच लक्ष्य मातेचे ॥ ३४ ॥ विचार करावे मातेने । मोठे व्हावे तान्हुल्याने । नुसते न कधी देहाने । परी परिपूर्ण ज्ञानाने ॥ ३५ ॥ काही कारणास्तव दूर लोटते । परी चित्त बाळातच असते । जवळ राहून जे मिळते । अधिक दूर गेल्याने मिळते ॥ ३६ ॥ अहो सामान्य माता जाणते । कैसे न कळे समर्थां ते ? । शिष्याचे हित पहाण्याते । गुरूंचे मन धडपडते ॥ ३७ ॥ समर्थ ज्ञानी असल्यामुळे । वेळप्रसंगी त्यांस कळे । त्यांच्या योगलीलेमुळे । समर्थपण प्रसंगी कळे ॥ ३८ ॥ वेळ प्रसंगी लाडक्यांस । दूर लोटावे लागे त्यांस । ज्ञानाच्या शिदोरीस । सोबत होते शिष्यांस ॥ ३९ ॥ जवळ असलेल्या शिदोरीस । मातेच्या संस्कारांस । भरलेल्या ज्ञान घड्यास । फार महत्व वेळप्रसंगास ॥ ४० ॥ जैसे मायलेकरांचे असते । तैसेच गुरूशिष्यांचे असते । वात्सल्यास फार महत्व असते । जग वात्सल्यावर टिकते ॥ ४१ ॥ ऐसेच गजानन पितांबराचे । नाते होते गुरूशिष्यांचे । एकमेकांच्या ओढीचे । अतोनात वात्सल्याचे ॥ ४२ ॥ एक दिवस ऐसे जाहले । पितांबराचे मन गुंतलेले । पूजा करण्यात रमलेले । त्यातच एकरूप झालेले ॥ ४३ ॥ जे जवळ असायचे । त्यावर संतुष्ट असायचे । ऐसे वागणे पितांबराचे । गजाननाच्या शिष्याचे ॥ ४४ ॥ समर्थ वदले पितांबरास । काय नेसतोस फाटक्या वस्त्रांस ? । जुन्या पुराण्या सोळ्यास । दुसरे नको तुला नेसण्यास ? ॥ ४५ ॥ पितांबरा ! हा घे दुपेटा । हो येथून चालता । राहू नकोस येथे आता । लावू नकोस बट्टा ॥ ४६ ॥ पितांबरास वाईट वाटले । त्याला अगदी भरून आले । एका डोळ्यात हसू आले । दुसर्या डोळ्यात आसू आले ॥ ४७ ॥ तो दुपेटा नेसला । देहाने मनाने फुलला । क्षणभर बघत राहिला । काहि न कळे त्याला ॥ ४८ ॥ काहिंना बघवेना । ते वदले त्या क्षणा । अरे ! समर्थे दुपेटा देताना । केली कानउघाडण्या ॥ ४९ ॥ ही न कृपादृष्टी । ही तुझी हकालपट्टी । समर्थ अंतरंग जाणती । तेणे घडली ऐशी कृती ॥ ५० ॥ योग्याचा अंतर्भाव योगी जाणतो । दुसरा न जाणतो । हा बोल खरा ठरतो । पितांबर त्याचे उदाहरण ठरतो ॥ ५१ ॥ समर्थे हाकलवले पितांबरास । चालला पुढील रस्त्यास । निघाला पुढील कार्यास । महाराजांचे नाव करायास ॥ ५२ ॥ पाऊल पुढे पडत होते । चित्त मागे गुरूंकडे होते । महाराजांत गुंतले होते । मनाचे विचार जात नव्हते ॥ ५३ ॥ शेगाव डोळ्यासमोरून । हलत नव्हते तेथून । देहाच्या क्रिया भिन्न । मनाच्या क्रिया भिन्न ॥ ५४ ॥ मुलगी जशी सासरी जाते । तैसे त्याचे झाले होते । गुरूचे घर माहेर होते । पुढची वाट सासर होते ॥ ५५ ॥ नशिबातला सासुरवास । जो असतो प्रत्येक मुलीस । तैसा वाटत होता त्यास । दिसत होता डोळ्यांस ॥ ५६ ॥ एक आनंद मावळत होता । दुसरा उषःकालात होता । संमिश्रभाव दाटला होता । हृदय बोलके करत होता ॥ ५७ ॥ नयनी आंसवे दाटलेली । पुढची वाट धरलेली । कधीही न पाहिलेली । अगदी नवीच असलेली ॥ ५८ ॥ श्री पासून सुरू करायचे । सर्वांचेच मन राखायचे । महाराजांशिवाय जगायचे । आईशिवाय जगायचे ॥ ५९ ॥ माऊली आठवण काढताच । नाही भेटणार आत्ताच । आठवणी काढायच्या नुसत्याच । ताज्या मानायच्या त्याच ॥ ६० ॥ अशी वाट चालायची । सवय नव्हती कधी त्याची । सुखदुःखाच्या वाटेची । आईशिवाय अनुभवायची ॥ ६१ ॥ पाऊले पुढे पडत होती । जणू टाकली जात होती । अंगात शक्ती नव्हती । बोलण्याची सोय नव्हती ॥ ६२ ॥ गतकालच्या आठवणी । त्यांची होत होती उजळणी । व्यत्यय न आणला कुणी । मागच्यास पुढे टाकूनी ॥ ६३ ॥ पहिले गेल्यावाचून । दुसरे न येणार आपणहून । हेच आले घडून । पितांबर न सुटला त्यातून ॥ ६४ ॥ मागील आठवणींचे पाढे । भराभर येती पुढे । पुढच्या जीवनाचे पाढे । घोकता घोकता जाई पुढे ॥ ६५ ॥ विचारांच्या तंद्रीत अंतर कापले । त्याचे त्याला न कळले । पहाता पहाता गाव आले । कोंडोली ग्राम दिसू लागले ॥ ६६ ॥ प्रत्येक गावचे वातावरण । अगदी असते भिन्न । तत्वाचे ठराविकपण । कधी न होणार भिन्न ॥ ६७ ॥ काही विशेष दिसताक्षणी । जमावे चारचौघांनी । मनसोक्त करावी बोलणी । वाटे प्रत्येकजण शहाणी ॥ ६८ ॥ परी वेळ प्रसंगात । शहाणे मूर्ख ठरतात । मूर्ख शहाणे ठरतात । उलटे सुलटे अनुभवतात ॥ ६९ ॥ पितांबराचे असेच झाले । रात्रभर झाडावर बसावे लागले । पहाता पहाता तांबडे फुटले । कोंबड्याचे आरवणे सुरू झाले ॥ ७० ॥ गाव जागे झाले । व्यवहार सुरू झाले । पायवाटा हालचालींमुळे । सुन्नतेचे नाव विरले ॥ ७१ ॥ पक्षांचे चिवचिवणे । गायी गुरांचे हंबरणे । पोरांचे बागडणे । होत होते मुक्तपणे ॥ ७२ ॥ आंब्याच्या झाडावर । बसलेला पितांबर । पोरे तेथे जमल्यावर । हसू लागली त्यावर ॥ ७३ ॥ तो एक एक फांदी बदलत । जात होता पुढे सरकत । माकडचेष्टा होती वाटत । पोरांना कुतुहल त्यात ॥ ७४ ॥ मुंग्या मुंगळे झाडावरी । त्यास सतावे भारी । त्यातुनी सुटका होण्यावरी । ऐसे कृत्य तो आचरी ॥ ७५ ॥ दोन जमले की चार जमतात । नियम तंतोतंत पाळतात । नेमके प्रश्र्न विचारले जातात । नेमकी उत्तरे मिळतात ॥ ७६ ॥ नियम तेथे खरा ठरला । जन समुदाय गोळा झाला । जो तो कारण पुसु लागला । त्याच्या ऐशा कृत्याला ॥ ७७ ॥ पितांबरास विचारले । त्याने सर्वांस सांगितले । जनांस कुतुहल वाटले । सार्यांनाच न ते पटले ॥ ७८ ॥ पट्टशिष्य गजाननाचा । बोल ऐकता पितांबराचा । गावकर्यांस न पटला त्याचा । म्हणती डाव भोंदूगिरीचा ॥ ७९ ॥ शिष्य ओळखला जातो । तो न सांगावा लागतो । सारा भार कृतीवर असतो । कृतीनेच नराचा नारायण होतो ॥ ८० ॥ जमलेले म्हणती त्यास । खोटे बोलू नकोस । भोंदूगिरी करू नकोस । बाया पोरांना फसवू नकोस ॥ ८१ ॥ खरे खोटे शोधून काढू । खोटे ठरता बडवून काढू । अंगाची सालटे काढू । नको बाया बापड्या भोंदू ॥ ८२ ॥ चोर ढोंगी टवाळखोर । तू बोलशील बडविल्यावर । सर्व निमूटपणे सांगितल्यावर । तुला न त्रास देणार ॥ ८३ ॥ उगाच सोंग करू नकोस । भलते सलते सांगू नकोस । आम्ही ओळखतो गजाननास । लावू नकोस बट्टा त्यास ॥ ८४ ॥ महाराजांनी वठलेल्या आंब्याला । फळे आणली त्याला । नुसती पालवी आण त्याला । दाखव तुझ्या चमत्कृतीला ॥ ८५ ॥ अनपेक्षितपणे प्रसंग आला । पितांबर अस्वस्थ झाला । गुरूंचा धावा करू लागला । मनोमन आळवू लागला ॥ ८६ ॥ म्हणाला महाराज । कैसा प्रसंग आला आज । तुम्हीच राखा माझी लाज । अन्यथा बेअब्रु होईल आज ॥ ८७ ॥ भास्करा वैकुंठा पाठविले । मी ऐसे काय केले ? । सर्वांनी मला घेरले । संकट विनाकारण ओढवले ॥ ८८ ॥ तूच धाव आता । तूच ठरणार त्राता । तू दिलेला हा दुपेटा । तूच म्या रक्ष आता ॥ ८९ ॥ पालवी न फुटता । लोक मारतील लाथा । खरा शिष्य ठरेल खोटा । तुझ्या नावाला लागेल बट्टा ॥ ९० ॥ त्याला प्रेरणा मिळाली । त्याला हिंमत आली । नामगजराची युक्ती सुचली । तीच तारती झाली ॥ ९१ ॥ लोकांना अट घातली । धून लावता धावेल गुरू माऊली । लाभता कृपासावली । वृक्षास येतील पाने भली ॥ ९२ ॥ गावकरी वदले त्यावर । धून लावल्यावर । जर पालवी न फुटणार । तर आम्ही तुला बडवणार ॥ ९३ ॥ त्याच्या सुरात सूर मिसळला । काही काळ लोटला । सुकलेल्या फांदीला । चीक दिसू लागला ॥ ९४ ॥ जो तो पाहू लागला । आश्चर्याचा धक्का बसला । स्वतःस चिमटे काढु लागला । भानाचाही विसर पडला ॥ ९५ ॥ लोकांस जादूचे खेळ वाटले ।लोकांस नजरबंदीचे खेळ वाटले । प्रथम विश्वास न बसले । खरे बोलणे खोटे वाटले ॥ ९६ ॥ अखेर पितांबर शिष्य पटले । गावकरी माफी मागू लागले । विनम्र भावे वंदन केले । फुलहार गळ्यात घातले ॥ ९७ ॥ पितांबर शहाणा ठरला । गैरसमज दूर झाला । पालवी फुटली डहाळीला । हिरवा रंग पालवीला ॥ ९८ ॥ गावकर्यांनी पितांबरास ओळखले । त्याला पालखीतुनी मिरविले । त्याचे शब्द झेलू लागले ॥ ९९ ॥ गुरूकृपेनेच सर्व घडते । अन्यथा विपरीत घडते । उगाच नाही कुणी शब्द झेलत । कृती असावी लागते श्रेष्ठ ॥ १०० ॥ पितांबराच्या शोधात गुरू येतील । वासराच्या शोधात गोमाता येईल । सारे गाव पावन होईल । नव चैतन्य निर्माण होईल ॥ १०१ ॥ त्या झाडास पुढे जी फळे आली । इतरांपेक्षा जास्त आली । गावकर्यांनी चूक सावरली । कोंडोली कर्मभूमी ठरली ॥ १०२ ॥ जैसे रक्षिले पितांबरास । तैसेच रक्षो तुम्हास । पाळावे गुरू आज्ञेस । जेणे व्हाल गुरूकृपेस ॥ १०३ ॥ एकेकाची कर्मभूमी निश्चित असते । गुरू गजाननाचे तसेच होते । शेगाव सुटत नव्हते । तेच त्यांच्या नशिबी होते ॥ १०४ ॥ गावकरी सेवा करीत होते । समर्थ एका घरी स्थिर नव्हते । त्यांना भक्त आवडत होते । एकाकडे रहाणे पसंत नव्हते ॥ १०५ ॥ उगाच भक्तांच्या घरच्यांस । नको उपाध्या वाट्यास । सार्यांनीच त्यांच्या तैनातीस । पसंत नव्हते त्यांस ॥ १०६ ॥ खर्या अर्थी योगीपुरूष होते । नुसत्या देहाने जगत नव्हते । प्रत्येक कृतीतून पटवत होते । उगाचच स्वतःस मिरवत नव्हते ॥ १०७ ॥ वारंवार प्रसंग यायचे । नित्य नविन घडायचे । जशास तसे न वागायचे । हेच सर्वांना पटवायचे ॥ १०८ ॥ सहज कृतीतुन उतरत होते । अंगवळणीच पडले होते । मुद्दाम काहिच करायचे नसते । हेच ते पटवत होते ॥ १०९ ॥ जसा कुणी पाहुणा येता । मुद्दाम चहा चांगला करता । काहितरी न्यूनता । हेच तुम्ही अनुभवता ॥ ११० ॥ मुद्दाम न काही करायचे । सहजपणे जगायचे । ओढून ताणून न वागायचे । हेच त्यांना पटवायचे ॥ १११ ॥ जो सर्वांची मने जिंकणार । त्यांच्या हृदयात वसणार । जो तो त्यांचाच होणार । का न तो योगी होणार ? ॥ ११२ ॥ ऐसी कृती करावी । दुसर्याच्या हृदयात ठसावी । सदा विशेष ठरावी । प्रेरणादायक ठरावी ॥ ११३ ॥ समर्थ शिकलेले नव्हते । त्यांना उपजतच होते । पुष्कळसे उपजततेवर असते । जे सारे शिक्षणातून न मिळते ॥ ११४ ॥ योगी सर्व सारखे मानणार । घरदार विशेष नसणार । जो दिशा हेच वस्त्र समजणार । कैसा घरास महत्व देणार ? ॥ ११५ ॥ एके दिवशी सर्व भक्तांस । समर्थे सांगितले त्यांस । कुणाचे घर नको आम्हांस । जाऊ दुसर्या जागेस ॥ ११६ ॥ गावात दुफळी माजली फार । जो तो कुरापती काढणार । हे न मला खपणार । मी न आता येथे रहाणार ॥ ११७ ॥ मी निघालो, सोडीन गाव । नको हे शेगाव । शोधीन दुसरा गाव । गर्दीस न मिळे वाव ॥ ११८ ॥ विधात्यास मंजूर नव्हते । प्रारब्ध आडवे होते । कर्मभूमी बदलत नव्हते । तेणे शेगावीच झाले रहाते ॥ ११९ ॥ कुणाची बदली करणे । अथवा ती रद्द करणे । हे अधिकार्यांचे पहाणे । त्यानेच अधिकार गाजवणे ॥ १२० ॥ अधिकार्यास विनविता । त्याची मर्जी संपादन करता । हेतू साध्य करता । अन्यथा विपरित भोगता ॥ १२१ ॥ ईश्वर जगात कर्ता । पालन कर्ता नि त्राता । सर्वोच्च अधिकार हाता । सूत्रे चालन कर्ता ॥ १२२ ॥ भक्तांच्या प्रार्थना । ईश्वरास नाना । समर्थांनी तेथून हलण्या । नव्हते पसंत कुणा ॥ १२३ ॥ प्रेरणा दिली भक्तांस । भक्त वदले समर्थांस । माफी असावी कृत्यांस । सोडू नका शेगावास ॥ १२४ ॥ तुम्ही सांगाल ते ते कृतीतुनी । नाही दुखवणार कुणी । विनवणी केली भक्तांनी । जाऊ नये शेगावातुनी ॥ १२५ ॥ जेव्हा कुणी तयार नसते । गळीच उतरवावे लागते । शेगावकर हुशार होते । पक्के मुरलेले होते ॥ १२६ ॥ समर्थांस पटवणे सोपे नव्हते । शेगावकर योग्य होते । सरस पट्टीतले होते । सोडण्यास तयार नव्हते ॥ १२७ ॥ समर्थांची कृपादृष्टी । तीच होती आधारमूर्ती । उपाधी वाटत नव्हती । परी सोबतच होती ॥ १२८ ॥ अंधारातून प्रकाशाकडे । नेण्यास समर्थ बापडे । खरा आधार सापडे । कोण त्यांना सोडे ? ॥ १२९ ॥ वागणूक अशी असावी । दुसर्यांस सोबत ठरावी । निःस्पृहतेची जोड हवी । शुद्ध चित्ताची साथ हवी ॥ १३० ॥ शब्द मोडवेना भक्तांचा । केवढा कनवाळू मनाचा । शोधून न सापडायचा । ऋणानुबंध शेगावचा ॥ १३१ ॥ भाग्य शेगावकरांचे । समर्थे ऐकावे त्यांचे । बदलावे विचार स्वतःचे । भक्तांचे होऊन रहावयाचे ॥ १३२ ॥ अशी जागा घ्यावी । कुणाची मालकी नसावी । मला मिळता ग्वाही । राहीन मी शेगावी ॥ १३३ ॥ समर्थांचे चमत्कारिक । नाही व्यवहारिक । हवी असता त्यांची जवळिक । पाळावा लागतो त्यांचा शब्द एकेक ॥ १३४ ॥ भक्तांस पडला प्रश्र्न । केले त्यांचे स्मरण । समर्थे जाणले मन । टाळला बिकट क्षण ॥ १३५ ॥ समर्थ वदले भक्तांस । सरकार देईल जागेस । मागावे जागेस । येईल त्यात यश ॥ १३६ ॥ जागा नाही सरकारची । मालकी सच्चिदानंदाची । छाती न त्याची व्हावयाची । जागा नाकारण्याची ॥ १३७ ॥ तेव्हा सत्ता परकीयांची । इंग्रज सरकारची । वेळ होती भारताची । त्यांच्या गुलामगिरीची ॥ १३८ ॥ भारतवासी गुलाम होते । इंग्रजांस भुलवणे सोपे नव्हते । समर्थांचे सहाय्य होते । तेणे सर्व जुळत होते ॥ १३९ ॥ गुरू आज्ञा प्रमाण मानले । जागेसाठी अर्ज केले । अधिकार्यांनी वाचले । सर्व विचारात पडले ॥ १४० ॥ त्यावर बैठकी झाल्या । सल्ला मसलती झाल्या । काही अटी घातल्या । अर्ज मंजूर झाला ॥ १४१ ॥ लेखी जवाब मिळाला । सरकारचा होकार कळला । आनंदास पारावार न राहिला । समर्थांचा शब्द खरा ठरला ॥ १४२ ॥ मठासाठी “करी” साहेबांनी । जागा दिली तत्क्षणी । एक एकर जागा देऊनी । तपशील दिला धाडुनी ॥ १४३ ॥ समर्थांची जैशी कृपा शेगावास । तैशी असुद्या बडोद्यास । भव्य दिव्य वास्तू बडोद्यास । हीच ईच्छा गणामहाराजास ॥ १४४ ॥ जागा मिळाल्यावर जे घडते । ते पुढिल अध्यायी येते । प्रसंग वाचावेत शांत चित्ते । होईल प्रसन्न मन त्याते ॥ १४५ ॥ नका आचरू दंभाचारास । नको वैभवाच्या प्रदर्शनास । ऐसे आळवावे गजाननास । पालवी फुटेल कल्पवृक्षास ॥ १४६ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य द्वादशोऽध्यायः संपूर्णः ॥