श्री गणेशाय नम: । सविता सूर्यनारायणा । करू किती मी विनवण्या ? । येण्या माझ्या स्थानाला ॥ १ ॥ नाश करतो अज्ञान तिमिरा । तूच मांडला ज्ञान पसारा । अज्ञानास न मिळे थारा । तुला विनविता अंगातून धारा ॥ २ ॥ घालतो द्वादश नमस्कार । करावा त्यांचा स्विकार । पत्नीचाही जीव तुझ्यावर । अर्पिते भक्ती निष्ठेचा हार ॥ ३ ॥ जाण मनोरथ आमचे । काय हेतू उभयतांचे । स्वतः भक्तीत रमायचे । दुसर्यांस भक्तीत रमवायचे ॥ ४ ॥ आम्ही वेगळे देहाने । परी एकच विचाराने । अज्ञानावर पडावीत किरणे । ज्ञानी होण्यास न राहे उणे ॥ ५ ॥ सर्वज्ञ सूर्य नारायणा । धावून यावे या स्थाना । तुझ्या प्रकाशाविणा । अशक्यच जगण्या ॥ ६ ॥ सूर्यनारायणा ! तूच जीव रक्षितो । तूच आम्हां रक्षितो । तूच दीनोद्धार करतो । गणामहाराज जाणतो ॥ ७ ॥ तुझ्या ठराविकपणास । तू येतोस उदयास । असू दे सहाय्य लेखनास । तुझा प्रकाश उपयुक्त लेखनास ॥ ८ ॥ सूर्यनारायण संबोधिता गुरूस । त्याच्या कृपेने अज्ञान नाश । भक्त विनविती गुरूस । येण्या आपल्या घरास ॥ ९ ॥ असेच वाटले एका भक्तास । मलकापूरच्या विष्णुसास । महाराज यावे आपल्या घरास । कृपाशिर्वाद असावेत सर्वांस ॥ १० ॥ हा विष्णुसा खटावच्या गिरणीत । नोकरीस होता त्यात । समर्थ आले असता गिरणीत । विचार आला त्याच्या मनात ॥ ११ ॥ अकोल्याच्या गिरणीत । आणले स्वामी समर्थ । भूमी पावन करण्यात । मनोरथ पूर्ण करण्यात ॥ १२ ॥ मनोरथांस घोडे समर्थांचे । समर्थांविणा पुढे न जाणे रथाचे । ते मध्येच रूतून बसायचे । काही हाती न यावयाचे ॥ १३ ॥ भक्तांच्या मनोरथास । समर्थ कृपेचे घोडे असल्यास । मदतरूप पुढे जाण्यास । कुणी न अडविणार त्यास ॥ १४ ॥ हे न भक्त विसरणार । तेणे समर्थां विनविणार । आपल्या घरी नेणार । हेतू साध्य करणार ॥ १५ ॥ गुरूकृपेतच सारे मिळते । हे अनुभवाने पटते । जे जे मनास पटते । त्यानुसार केले जाते ॥ १६ ॥ मलकापूरच्या विष्णुसास । गुरूंचे महत्व पटले त्यास । जेणे विनविले समर्थांस । म्हणे यावे आपल्या घरास ॥ १७ ॥ समर्थ वदले त्यास । आग्रह करू नकोस आम्हांस । पुन्हा कधी येऊ घरास । जाणतो तुझ्या भावनांस ॥ १८ ॥ समर्थांस मलकापूरी न्यायला । लावला पाहिजे वशीला । भास्कर योग्य त्याला । विचार मनी आला ॥ १९ ॥ खुलवले त्याने भास्करास । जवळचा तू महाराजांस । तूच सांगता पटेल त्यांस । तेणे समर्थ येतील घरास ॥ २० ॥ भास्करास पटले । महाराजांस विनविले । आमंत्रण विष्णुसाचे आले । मलकापुरी जाणे नक्की केले ॥ २१ ॥ महाराज वदले भास्करास । नको बळी पडू आग्रहास । पुढे जाऊ मलकापुरास । सांगावे तैसे विष्णुसास ॥ २२ ॥ नको घेऊस आमंत्रण । फजीतीस उगाच कारण । समर्थे पुढचे जाणून । भास्करा सांगितले बजावून ॥ २३ ॥ भास्कर वदे समर्थांस । जाऊ विष्णुसाच्या घरास । बोलावले इतुके पूजनास । नाही का हो म्हणावे त्यास ? ॥ २४ ॥ भास्करे समर्थां सांगितले । मलकापूरचे नक्की केले । त्यास तैसे मी सांगितले । आता जाणे भाग पडले ॥ २५ ॥ मलकापुरास जावया निघाले । इच्छेविरूद्ध झाले । गाडीने जाण्याचे नक्की केले । स्टेशनावर दोघे आले ॥ २६ । गाडी आली क्षणात । गर्दी झाली क्षणात । काही उतरण्यात, चढण्यात । जो तो आपापल्या तंद्रीत, विचारात ॥ २७ ॥ स्टेशन मास्तरास विनविले । डबा मोकळा करण्यास सांगितले । समर्थांस बसण्यास विनविले । व्याधी उपाधीस केले मोकळे ॥ २८ ॥ भित्या पाठी ब्रह्मराक्षस । आमंत्रण दिले व्याधी उपाधीस । तोच प्रसंग अनुभवास । आला येथे भास्करास ॥ २९ ॥ मोकळ्या झालेल्या डब्यात । समर्थांनी बसावे त्यात । ह्या हेतूने तो वदे समर्थांस । “बाबा! बसावे डब्यात” ॥ ३० ॥ महाराज काही न बोलले । प्लॅटफॉर्म वर तसेच बसले । मंत्रजपात तल्लीन झालेले । एका वेगळ्याच आनंदात रमलेले ॥ ३१ ॥ गाडी जास्त वेळ थांबवेना । गाडीस शिटी दिल्यावाचून चालेना । शिटी काही दिली जाईना । गाडी काही सुटेना ॥ ३२ ॥ भास्कर जरा गोंधळला । थोडा बाजूस सरला । समर्थे संधीचा फायदा घेतला । भास्करास चकवला ॥ ३३ ॥ समर्थांच्या मनात विचार आला । त्यांनी मार्ग अनुसरला । मोकळा डबा सोडला । स्त्रियांचा डबा धरला ॥ ३४ ॥ एक योगी स्त्रियांची अब्रू रक्षितो । कुविचार त्याचे मनात न येतो । तो हितरक्षक असतो । तेणेच ऐसा विचार मनात येतो ॥ ३५ ॥ डब्यातल्या बायका घाबरल्या । एकमेकीकडे बघू लागल्या । योग्यास नंगा पिसा समजल्या । त्यास हाकलवू लागल्या ॥ ३६ ॥ तक्रार केली पोलिसांस । धावून यावे लागले पोलिसांस । समजावले समर्थांस । सांगितले खाली उतरण्यास ॥ ३७ ॥ स्टेशनमास्तरही येता झाला । वृत्तांत सर्व जाणला । सर्वांना समजावू लागला । ह्याचा न त्रास तुम्हाला ॥ ३८ ॥ ह्यांना राहू द्यावे डब्यात । बायका काही ऐकेनात । म्हणती नंगा पिसा डब्यात । पोलिसही ऐकेनात ॥ ३९ ॥ पुष्कळ समजावले समर्थांना । काही उपयोग होईना । स्टेशन मास्तरने समर्थांना । केली विनम्र प्रार्थना ॥ ४० ॥ कृपया खाली उतरावे । बायकांच्या विनंतीस मान द्यावे । कायद्यानेच वागावे । कायद्यापुढे न चालावे ॥ ४१ ॥ महाराज उतरले खालती । ह्या त्यांच्या गुन्ह्यावरती । खटला भरला त्यांचेवरती । कायद्याप्रमाणे वागण्यासाठी ॥ ४२ ॥ भास्कराचा थरकाप झाला । समर्थांच्या इच्छेविरुद्ध जाण्याला । विपरित प्रसंग भोगण्याला । उगाच स्विकारले आमंत्रणाला ॥ ४३ ॥ चौकशीस बापूसाहेब जठार । निःपक्षपणे न्याय देणार । संपूर्ण चौकशी करणार । न्याय देण्यात हुशार फार ॥ ४४ ॥ तारीख खटल्याची आली । गर्दी डाकबंगल्याजवळ झाली । फिर्याद समर्थांवर झाली । सुनवणी ऐकण्यास जमली ॥ ४५ ॥ व्यंकटराव देसाई कामानिमित्त आलेले । ते गर्दी पहाते झाले । जठारास विचारते झाले । वृत्त सर्व त्यांस कळले ॥ ४६ ॥ जठारे सांगितले देसायास । बोलवावे समर्थांस । धाडले बोलावणे समर्थांस । कुणी सुचविले नेसवा धोतरास ॥ ४७ ॥ नागवेपणाचा झाला गुन्हा । तो न व्हावा पुन्हा पुन्हा । नेसवा धोतर महाराजांना । नंतरच न्यावे त्यांना ॥ ४८ ॥ हा सल्ला पटल्यावर । समर्थांस नेसवले धोतर । वाटेत पुढे गेल्यावर । समर्थे सोडले धोतर ॥ ४९ ॥ नागवेच गेले चौकशीस । नेले बरोबर भास्करास । जठारांनी पुसले समर्थांस । का हो नागवे फिरता रस्त्यांत ? ॥ ५० ॥ महाराज त्यावर हसले । तुझी डबी काढ झाले । हातात तंबाखू चोळू लागले । जठार क्षणात विरघळले ॥ ५१ ॥ जठार न्याय देते झाले । जठार सर्वांस म्हणाले । बोलावण्या शिपाया पाठवले । तो वेगळेच अनुभवास आले ॥ ५२ ॥ शिपायाच्या हातास असे धरले । रक्तप्रवाह बंद झाले । धोतर नेसण्यास लावले । तेही वाटेत सोडले ॥ ५३ ॥ ते न कुणा घाबरले । न कुणाची अब्रू घेते झाले । न कुणाच्या वाटेला गेले । स्वतःच्या तंद्रीत राहिले ॥ ५४ ॥ मुळचाच विदेही विकार नसलेला । हा स्वतःचा न राहिला । दुसर्याने संभाळावे त्याला । जेणे टळेल उपाधीला ॥ ५५ ॥ जो असे ह्यांच्या बरोबर । तोच काळजी घेणार । जो न त्यांस संभाळणार । तोच गुन्हेगार ठरणार ॥ ५६ ॥ ह्यांची जवाबदारी संभाळणार्यावर । नच त्यांच्या स्वतःवर । ते न गुन्हेगार ठरणार । सांभाळणाराच गुन्हेगार ठरणार ॥ ५७ ॥ अग्नी शोभतो अग्निहोत्रात । ते सांडण्या विपरित । अग्नी न दोषी ठरत । सांभाळणाराच असावा जागृत ॥ ५८ ॥ येथे सांभाळणारा भास्कर । पाच रूपये दंड भरावा सत्वर । चूक जाणता झाला भास्कर । म्हणे पुन्हा ऐशी चूक न होणार ॥ ५९ ॥ समर्थे आधीच बजावले त्यास । नको मलकापूर प्रवास । कारण होशील फजितीस । तेच आले अनुभवास ॥ ६० ॥ गुरू आज्ञा उल्लंघनात । दुःख यातना होतात । गुरू आज्ञा पालनात । प्रारब्ध भोग सुसह्य होतात ॥ ६१ ॥ महाराजांचे सहवासात । जे जे प्रसंग घडतात । ते उद्बोधक ठरतात । मार्गदर्शक ठरतात ॥ ६२ ॥ समर्थांचे सत्संगती अनेक । त्यातला अकोल्यातील एक । समर्थांचे भक्त अनेक । त्यातला अकोल्याचा बापूराव एक ॥ ६३ ॥ बापूरावाने समर्थांस । विनविले घरी येण्यास । यावे तुम्ही अकोल्यास । कृपाशिष देण्यास ॥ ६४ ॥ होकार दिला बापूरावास । कबूल केले येणे अकोल्यास । रेल्वेने जाण्यास । हिम्मत न होई भास्करास ॥ ६५ ॥ भास्करे विचारले समर्थांस । अकोल्यास जाण्यास । करू का बैलगाडीस ? । वा दुसर्या साधनास ? ॥ ६६ ॥ बैलगाडीने निघाले अकोल्याला । बापूरावाचे सदनाला । घाबरला भास्कर रेल्वेला । त्या कोर्टकचेरीला ॥ ६७ ॥ तत्पूर्वी महताबशा बापूरावाला वदला । बापूराव! अवलीया येता तुझ्या घराला । आमंत्रण धाड मला । येईन त्याला भेटायला ॥ ६८ ॥ बापूराव स्मरता झाला । माणूस कुरुमला पाठवला । अंतर्ज्ञाने कळले महताबशाला । तेणे गाडीतून निघाला अकोल्याला ॥ ६९ ॥ तो अर्ध्या वाटेत आला । एक माणूस भेटला त्याला । पत्ता महताबशाचा विचारला । सांगे आलो घ्यायला त्याला ॥ ७० ॥ ऐकता “तोच मी महताबशा” वदला । “जाऊ नको तू कुरूमला । बापूरावाचे आमंत्रण कळले मला । जेणे निघालो अकोल्याला” ॥ ७१ ॥ महताबशाने सांगितले । त्या माणसास पटले । आपल्या गाडीत बसवले । बापूरावाच्या घरी आणले ॥ ७२ ॥ दुसरे दिवशी महाराज आले । महताबशास पहाते झाले । त्याचे केस पकडले । त्यास भानावर आणले ॥ ७३ ॥ साथीदारास दृष्य पहावेना । ह्यातील मर्म कळेना । बोलती समर्थांना । कोणता केला गुन्हा ? ॥ ७४ ॥ समर्थ वदले “अरे महताबा! । सोड येथला ताबा । तुमचे प्रस्थ माजले बाबा । लोक येथले त्रस्त बाबा ॥ ७५ ॥ तू करावास उपदेश । नका पीडा देऊ दुसर्यांस । अकारण पीडा दिल्यास । अल्ला न सोडणार तुम्हास” ॥ ७६ ॥ तत्व कळले महताबशास । नको कारण तमाशास । म्हणाला साथीदारांस । नका पीडा देऊ कुणास ॥ ७७ ॥ अवलीयाची आज्ञा प्रमाण मानतो । कुरुमची मशीद तशीच ठेवतो । पूर्ण करण्यास दुसर्यास सांगतो ॥ ७८ ॥ तुम्ही धरावे ह्यांचे चरण । करावे आज्ञा पालन । चौघांना कुरूमला दिले पाठवून । मशीदीचे काम करण्या पूर्ण ॥ ७९ ॥ येथे बच्चूलाल आला दर्शनाला । आमंत्रण करायला । दुसरे दिवशी टांगा केला । बच्चूलालच्या घराला ॥ ८० ॥ टांगा आला बच्चूलाल सदना । परी समर्थ काही उतरेना । प्रयत्न केले नाना । परी यश कुणा येईना ॥ ८१ ॥ एका धूर्ताने सांगितले । महताबशास वगळले । तेणे न खाली उतरले । तैसेच बापूरावाकडे परतले ॥ ८२ ॥ टांग्यात बसवा दोघांना । आनंद होईल महाराजांना । म्हणणे पटले सर्वांना । भोजना बोलविले दोघांना ॥ ८३ ॥ दोघांना टांग्यात बसविले । गावात मिरविले । महाराज खूष झाले । बच्चूलालास हायसे वाटले ॥ ८४ ॥ महताबशास थेटरात उतरवले । समर्थांस राम मंदिरात उतरवले । समर्थ महताबशास भेटले । उदात्त भोळे भाव व्यक्त केले ॥ ८५ ॥ समर्थांची शिकवण । दिसे त्यांच्या कृतीतुन । महताबशास केले ताडण । परी न जेवले त्याच्यावाचून ॥ ८६ ॥ दोघे बरोबर जेवले । महताबे शेख कडूस बोलवले । पंजाबचे तिकिट काढण्या सांगितले । सांगे येथले कार्य संपले ॥ ८७ ॥ शेख कडू म्हणे त्यास । “नका अर्धवट टाकू मशिदीस । तुमच्यावीण न पूर्णत्वास । नंतर जावे पंजाबास” ॥ ८८ ॥ महताब बोलले त्यावर । “मी कोण मशीद पूर्ण करणार? । आपापल्या कल्पनांवर । निराकारच करतो साकार “॥ ८९ ॥ दगड, माती, चुना, वीटा । हीच साधने दोन्हिंत असता । आकारने वेगळे होता । मंदिर मशिद म्हणता ॥ ९० ॥ नको महत्व देखाव्याला । महत्व द्यावे आतल्याला । नको महत्व रूपाला । महत्व द्यावे आत्म्याला ॥ ९१ ॥ आत्म्याचे चिंतन हाच सार । तोच अमर रहाणार । देह चिंतन सदा असार । तेणे भूवर होतो भार ॥ ९२ ॥ भेदभावास विसरावे । ते न कधी आचरावे । तेच घातक समजावे । अभेद वृत्तीने जगावे ॥ ९३ ॥ जरी जाती पाती जन्माने । एक व्हा कर्माने, कृतीने । नांदता ऐक्य भावाने । नांदाल सौख्याने ॥ ९४ ॥ शेख कडू तत्व समजला । पंजाबच्या तिकिटाला । तो काढता झाला । समर्थांचा अधिकार कळला ॥ ९५ ॥ इकडे बापूरावाच्या पत्नीस । भानामतीचा त्रास । बिब्ब्यांच्या फुल्या उठाव्या अंगास । तशाच त्या सर्व कपड्यांस ॥ ९६ ॥ दांडीवरचे वस्त्र जळावे । कधी अंगाची लाही लाही व्हावे । अन्न पाणी न गोड लागावे । मन कशातही न रमावे ॥ ९७ ॥ ती कंटाळली त्रासाला । ती कंटाळली जीवाला । घरचेही कंटाळले व्याधीला । भानामतीच्या उपाधीला ॥ ९८ ॥ डॉक्टर वैद्य सर्व झाले । औषधे करून थकले । मांत्रिकासही बोलाविले । गंडे, दोरे, ताईत केले ॥ ९९ ॥ नाना तर्हेचे इलाज केले । परी निरूपयोगी ठरले । द्रव्य अतोनात खर्चिले । त्यासही अपयश आले ॥ १०० ॥ सरते शेवटी वदे समर्थांस । पत्नीस भानामतीचा त्रास । तेणे कंटाळली जीवास । नाना केले उपायास ॥ १०१ ॥ एकही उपाय न उपयोगास । तुम्हीच पहावे पत्नीस । मुक्त करा भानामतीस । हीच प्रार्थना तुम्हास ॥ १०२ ॥ बापूरावाचे हृदय व्यथीत । समर्थे जाणले क्षणात । वदले आराम पडेल दुखण्यास । होऊ नकोस भयभीत ॥ १०३ ॥ पत्नीकडे बघितले । तीस बोलते झाले । पोरी त्रास कसले ? । आता दुखणे पळाले ॥ १०४ ॥ पुढे एकदा समर्थ । आले अकोट गावाप्रत । मित्र नरसिंग राहे त्यात । उत्सुकता त्यास भेटण्यास ॥ १०५ ॥ त्याच्या घरी आल्यावर । रसभरीत गप्पा झाल्यावर । स्नानाचे मनात आल्यावर । समर्थ गेले विहिरीवर ॥ १०६ ॥ विहिरीच्या काठावर बसले । विहिरीत पाय सोडले । आत डोकावू लागले । नरसिंगही विचारात पडले ॥ १०७ ॥ असामान्यांचे सारे असामान्य । जेणे मिळते प्राधान्य । हे नसते पिसेपण । ह्यातूनच होते शिकवण ॥ १०८ ॥ नरसिंग तेथे आले । दृष्य बघते झाले । लोक सभोवताली जमले । चर्चेत ते गुंतले ॥ १०९ ॥ आपापल्या बुद्धीनुसार बोलले । परी येथे वेगळेच घडले । समर्थ पिसा वाटलेले । परी तेच समर्थ ठरले ॥ ११० । समर्थ वदती नरसिंगास । पहातो विहिरीत गंगा गोदेस । त्यांची कृपा असल्यास । न्हाऊ घालतील आम्हांस ॥ १११ ॥ तू रोज स्नान करतो । आपली काया धन्य करतो । मी त्यांचा उगम बघतो । तेणे समाधान मानतो ॥ ११२ ॥ समर्थे एक चित्ते डोकावले । मंत्रजपात रंगलेले । तेथेच बसून राहिले । सर्वांस आश्चर्य वाटले ॥ ११३ ॥ दृष्टी विहिरीकडे स्थीर केली । विहिर क्षणात भरली । जणू एक एक नदी आली । विहिरीत मिसळली ॥ ११४ ॥ स्मरणात देखिल आमंत्रण । एकचित्ते करता स्मरण । जेणे येणे आपणहून । जेणे पटेल खूण ॥ ११५ ॥ ऐसे हाक मारणे व्हावे । स्वारीने हजर रहावे । ऐसे त्यास आळवावे । जेणे चित्त भुलावे ॥ ११६ ॥ जितकी जोरदार ईच्छाशक्ती । तितकीच जोरदार होते कृती । त्यानेच साधते प्रगती । हेच दिसते जगती ॥ ११७ ॥ जितकी ईच्छाशक्ती प्रबळ । तितका “तो” येतो जवळ । ”तो” येता जवळ । संकटे काढती पळ ॥ ११८ ॥ जो नामात रहातो । तो “मी” स विसरतो । जो “मी” स घालवतो । तो “तो” बोलवतो ॥ ११९ ॥ गणामहाराज करे प्रार्थना । हे सूर्य नारायणा । दूर करावे अज्ञाना । करावे ज्ञानी भक्तांना ॥ १२० ॥ गणामहाराज सांगे भक्तांस । जाणावे पूर्ण एकास । तोच धाडतो अनेकांस । येथेच सतरावा अध्याय जातो पूर्णत्वास ॥ १२१ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य सप्तदशोऽध्यायः संपूर्णः ॥