श्री गणेशाय नम: । हे वक्रतुंडा विघ्नहर्ता । तू सुखकर्ता । तू दुःखहर्ता । तू पावतोस शरणागता ॥ १ ॥ क्रोध कारण नाशास । शंकरास प्रत्ययास । स्वतःच्या मुलाच्या मुखकमळास । क्रोधाने छेदले त्यास ॥ २ ॥ क्रोध इतका नसावा । जेणे जीव चिंताक्रांत व्हावा । दुसर्यास ताप नसावा । हाच मार्ग अनुसरावा ॥ ३ ॥ भक्ती करावी इतुकी । संतोष होण्या इतुकी । दुसर्या आनंद देण्या इतुकी । नको प्रपंचास पोरकी ॥ ४ ॥ इतके असावे नामजपाला । जेणे प्राप्त शांत चित्ताला । महत्व आहे शांतीला । समाधानी वृत्तीला ॥ ५ ॥ प्रयत्नवादी असावे । अल्पसंतुष्ट नसावे । प्रयत्नवादी असावे । परी दुसर्याचे न हिरवावे ॥ ६ ॥ दुसर्याच्या हिरावण्यात । निश्चित र्हास । हेच येते प्रत्ययास । नको ऐशा कृत्यास ॥ ७ ॥ ज्याला वाटे व्हावे मंगल । नको चिंतन अमंगल । आचरण होता मंगल । गाठता मुक्काम मंगल ॥ ८ ॥ नामामुळे मंगल चिंतन । मंगल चिंतने गुरू स्मरण । गुरू स्मरणे गुरू चरण । तेणे घरास मंगल तोरण ॥ ९ ॥ जे मंगलमय झाले । ते गुरूमय झाले । भक्तीने जे जे अर्पिले । ते ते गुरूने स्विकारले ॥१० ॥ असेच गुरू गजानन भोळे । त्यांनी भक्तांस जवळ केले । भक्ताने गांजाचे नवस केले । श्री गुरूंनी ते स्विकारले ॥ ११ ॥ गांजाचा केला नवस । केवढे भक्ताचे साहस । जाणले गुरूंनी भक्तास । त्याच्या शुद्ध मनास ॥ १२ ॥ शेगावी गुरू गजानन असता । गर्दीस काय पुसता ? । मुद्दाम न कधी जमवता । ओढ लागते चित्ता ॥ १३ ॥ गर्दी नाही जमवावी लागत । जैसी दिसे राजकारणात । नेते भाड्याने जमवतात । गुरू नामाने जमवतात ॥ १४ ॥ नेत्यांचे अशुद्ध चित्त । त्यात भर पाडते वित्त । नाना क्लुप्त्या अंगीकृत । ओढण्या आपल्या पक्षात ॥ १५ ॥ गुरूंचे सदा शुद्ध चित्त । तुच्छ लेखतात वित्त । सत्कृत्याच्या भरीत । भक्तीभाव जागृत ॥ १६ ॥ शुद्धतेची बैठक टिकते । नच भाडोत्री टिकते । हेच अनुभवास येते । शुद्धतेत सारे मिळते ॥ १७ ॥ गुरू बोल मौलिक विचार । कोण त्यास भ्रष्ट करणार ? । जो दुसर्यास उद्धरणार । तो सदाचारीच असणार ॥ १८ ॥ कितीही प्रसंग बिकट । कळते गुरूची किंमत । श्री गुरू चमत्कृतीने श्रेष्ठ । नेता धन क्लुप्त्यात श्रेष्ठ ॥ १९ ॥ ऐसा नेता टिकणार । जो शुद्ध चित्ताने वागणार । वेदांचे सार हेच सांगणार । चित्त शुद्धीत सारे टिकणार ॥ २० ॥ जगावे व्यवहारापुरते । अंतरी भाव ईश्वरा भेटण्याते । मनाने त्याचे होण्याते । सदा कृपा त्याची असते ॥ २१ ॥ जो ईश्वर प्राप्तीस उत्सुक । तो नामाचे रोपटे लावण्यास उत्सुक । नाम घेता हसतमुख । ईश्वर भेट हसतमुख ॥ २२ ॥ जो नामाची ऐशी बी पेरतो । तो नामाने अविनाशी ठरतो । जरी तो देह रूपाने जातो । परी नामाने चिरंजीव होतो ॥ २३ ॥ नित्य ताजे नवे । शेगावी दिसावे । जेथे महाराज असावे । लीलेनेच नाचावे ॥२४ ॥ बंकटाच्या घरी । ऐन सकाळच्या प्रहरी । दर्शनास नरनारी । परगांवांहुन येणारी ॥ २५ ॥ नाना तर्हेचे भक्त जमले । नाना तर्हेचे नवस झाले । महाराजांचे दर्शन घेतले । कृतकृत्य झाले ॥ २६ ॥ तर्हेवाईक भक्तांचे तर्हेवाईक नवस । प्रसन्न करावे गजाननास । आले नवस फेडण्यास । कृपाशिष घेण्यास ॥ २७ ॥ गजाननाचे दास होण्याते । सर्वांनाच वाटते । परी नाही सोपे इतुके । हे अनुभवानेच पटते ॥ २८ ॥ वारंवार परिक्षा घेतात । जे उत्तीर्ण होतात । तेच दास होतात । बाकीचे तसेच रहातात ॥ २९ ॥ गुरू चरण सहज न मिळे । नुसत्या नवसाने न मिळे । स्वतःचे ओतावे लागते सगळे । हे सकळांस न कळे ॥ ३० ॥ आधी व्हावे लागते त्याचे । मग नवस बोलायचे । ऐसे नवस बोलायचे । जे गुरूने स्विकारायचे ॥ ३१ ॥ असाच गोसावी काशीचा । अंतर्मनाने महाराजांचा । नवस केला गांजाचा । म्हणे स्विकार करावा त्याचा ॥ ३२ ॥ प्रातःकाळच्या समयाला । काशीचा गोसावी आला । पहातो तो रांगेला । म्हणे कैसे होईल दर्शनाला ॥ ३३ ॥ रांगेत श्रीमंत नरनारी । हा गोसावी भिकारी । कोण त्यास उभा करी । क्षणभर विचार करी ॥ ३४ ॥ भगवी चिंधी डोक्यास । फाटकी लंगोटी नेसण्यास । एक झोळी बगलेस । बसून राहिला कोपर्यास ॥ ३५ ॥ दर्शनास गर्दी फार । दर्शन कैसे होणार ? । हाच सतत विचार । गोसाव्यास सतावे फार ॥ ३६ ॥ मुखे होतसे नामस्मरण । गजानन गजानन । होतसे त्याचे चिंतन । म्हणे कैसे घडेल दर्शन ? ॥ ३७ ॥ मी काशीस असताना । ऐकल्या त्याच्या कथा । ओढ लागली माझ्या चित्ता । आलो दर्शना करता ॥ ३८ ॥ काशीस असताना । गांजाचा नवस बोलताना । काही न आले माझ्या मना । कैसे अर्पण करावे ह्यांना ? ॥ ३९ ॥ गांजाचा नवस कळता । लोक मारतील लाथा । म्हणे भ्रष्ट करण्या करता । तू आलास येथे येता ॥ ४० ॥ परी मी बोललो मनाने । नवस केला आवडीने । स्विकारावी बुटी गुरूने । धन्य होईल माझे जीणे ॥ ४१ ॥ जे मला आवडते । त्याचे नवस होते । तेच अर्पण करण्याते । नवसाची पूर्ती होते ॥ ४२ ॥ त्याच्या जे जे मनात । विचार होते चालत । अंतर्ज्ञानाने जाणतात । श्री गुरू साक्षात ॥ ४३ ॥ अहो रांग जरी भली मोठी । परी प्रसन्न झाली गुरू माऊली । गुरूंनी खूण केली । गोसाव्यास ती पटली ॥ ४४ ॥ श्री गुरू कित्येक वेळी । न बोलती मुळी । बोलती ते ऐशा वेळी । जे ठरते योग्य वेळी ॥ ४५ ॥ हा गोसावी मुळचाच पुण्यवान । त्यात करे नामस्मरण । शिल्लक असता पुण्य । चांगल्या कुळी जनन ॥ ४६ ॥ जीवाचा संबंध अवलंबणार । एक एक कर्मावर । पुण्य कर्मावर । पुण्यवान होणार ॥ ४७ ॥ काशीचा गोसावी पुण्यवान । गजानने त्यास ओळखून । आणले बोलावून । एका कोपर्यातून ॥ ४८ ॥ गुरूस मनातले कळते । हे तत्व खरे ठरते । अगाध शक्ती जाणते । ह्याचे प्रत्यंतर येते ॥ ४९ ॥ गोसाव्याच्या खिशातली । गांजाची बुटी काढली । म्हणे का रे ऐशी लपवली ? । खुण सार्यांस पटवली ॥ ५० ॥ गजानन समर्थ ठरले, ठरणार । गोसावीही मुळचाच हुशार । संधीचा फायदा घेतला सत्वर । गुरूस बोलला तत्पर ॥ ५१ ॥ बुटी काढीन एका अटीवर । तुम्ही कधी न करावी दूर । गुरूंनी दिला होकार । केला तिचा स्विकार ॥ ५२ ॥ गुरू नाही भाळला बुटीला । जरी जवळ केले बुटीला । गुरू भाळले भोळ्या भावाला । जेणे गांजाचा स्वीकार केला ॥ ५३ ॥ काहिंना असे वाटते । नवसाने काय होते? । तीर्थ अंगार्याने काय होते? । हेच त्यांना कोडे पडते ॥ ५४ ॥ जे वैद्यकीय इलाजाने । नाही बरे होणार दुखणे । कैसे तीर्थ अंगार्याने । बरे होईल दुखणे? ॥ ५५ ॥ शंका कुशंका मनात । तर्क वितर्क मनात । काहूर माजते मनात । नाना प्रश्र्न मनात ॥ ५६ ॥ चित्ताची शांती ढळते । विचार चक्र जलद चालते । ऐसे चक्र जलद चालते । गुरू काय करणार तिथे ? ॥ ५७ ॥ गुरू ऐसे नाही वदणार । जेणे शांती ढळणार । गुरू दोषित नसणार । कर्मच दोषित ठरणार ॥ ५८ ॥ जीवनी कर्म प्रधान ठरते । प्रत्येक जीवास करावे लागते । त्याचे फळ भोगावे लागते । कोणी न सुटणार त्याते ॥ ५९ ॥ जैसे ज्याचे चिंतन । तैसे त्याचे आचरण । नको शंकेस स्थान । जेणे धोक्याचे कारण ॥ ६० ॥ शंकेने जी जी कृती । तेथे न होते प्रगती । संशयात्मा विनश्यती । हीच ठरते खरी उक्ती ॥ ६१ ॥ अहो वेदान्त एवढे सांगितले । ज्यांनी ज्यांनी अनुसरले । ते जीवनी धन्य झाले । जीवनाचे सार्थक झाले ॥ ६२ ॥ श्रद्धेने जे जे होते । ते फलदायी ठरते । श्रद्धेवर अवलंबण्याते । बोजे हलके होते ॥६३ ॥ श्रद्धेने टळते गंडांतर । ह्याचे येते प्रत्यंतर । जानराव देशमुखावर । आले एकदा गंडांतर ॥ ६४ ॥ शेगावात जानराव देशमुख । प्रसिद्ध व्यक्ती एक । तापाने पीडला देशमुख । झाली गती मरणोन्मुख ॥ ६५ ॥ ज्वराने जानरावास घेरले । कित्येक दिवस गेले । वैद्यकीय इलाज झाले । परी सारे निकामे ठरले ॥ ६६ ॥ रोग गेला बळावून । जानराव झाला क्षीण । जो होतो जर्जर क्षीण । तेव्हाच गुरू चरणी लीन ॥ ६७ ॥ हेच प्रत्ययास आले । जानरावाचे तसेच झाले । औषधोपचार सरले । आप्तेष्ट विचारात पडले ॥ ६८ ॥ नच काही उरले बळ । जो होतो हतबल । तो जातो गुरू जवळ । टाळण्या संकट सकळ ॥ ६९ ॥ बंकटाच्या घरी । गुरू माऊली वास करी । जावे त्याच्या घरी । आप्तेष्ट विचार करी ॥ ७० ॥ साधुने मनात आणता । त्याचे कृपाशीष मिळता । जानराव वाचेल आता । नको उशीर आता ॥ ७१ ॥ एक बंकटाकडे आला । वृत्तांत सारा वदला । म्हणे प्रार्थना करा गुरूला । द्यावे तीर्थ अंगार्याला ॥ ७२ ॥ त्यावर बंकट बोलला । श्रद्धेने घेता तीर्थाला । आराम पडेल त्याला । खात्री देतो तुम्हाला ॥ ७३ ॥ आपल्या वडिलांस वदला । भवानीराम थोर भला । विनवू लागला गुरूला । म्हणे देतो तीर्थ अंगार्याला ॥७४ ॥ श्री गुरू ! आम्ही अंधारात चालतो । दृष्यासच सत्य मानतो । अदृष्यास असत्य मानतो । अपयश येता धाव धेतो ॥ ७५ ॥ दावावा प्रकाश सत्वर । भाव सारा श्रद्धेवर । जेणे जानरावाचा ज्वर । जाईल सत्वर ॥ ७६ ॥ तीर्थ दिले आप्तेष्टाला । गेला जानरावाच्या घराला । श्रद्धेने पाजले त्याला । श्रद्धेचा महिमा आला फळाला ॥ ७७ ॥ गजानने वाचवले एका जीवाला । संत टाळती गंडांतराला । याचा प्रत्यय आला । गुरू खर्या अर्थी समर्थ म्हणायला ॥ ७८ ॥ जानरावाचा ज्वर बरा केला । तीर्थ अंगार्याचा महिमा पटवला । जो तो गजाननाचा झाला । चरण धरू लागला ॥ ७९ ॥ गुरूचरण तीर्थ फळाला । आले जानरावाला । तैसेच येवो तुम्हाला । हीच प्रार्थना गजाननाला ॥ ८० ॥ गजानन नव्हते नुसते वेषधारी । खरेखुरे सक्षात्कारी । जानरावास पटल्यावरी । भंडारा घातला बंकटाघरी ॥ ८१ ॥ भलते सलते प्रश्र्न । नका पुसू विनाकारण । गुरू जवळ जाऊन । व्हाल फजितीस कारण ॥ ८२ ॥ श्रद्धेचा खेळ चालतो । जो श्रद्धेवर विसंबतो । तोच वेळप्रसंगी तरतो । ऐसे गुरू वारंवार सांगतो ॥ ८३ ॥ उगाच घेऊ नका परिक्षा । तुम्ही काय घेणार परिक्षा ? । तो उत्तीर्णच होणार परिक्षा । नको शंका कुशंका ॥ ८४ ॥ तुम्ही काय प्रश्र्न विचारणार? । तुमचे प्रश्र्न क्षुल्लक असणार । निरर्थक असणार । परी उत्तर समर्पक मिळणार ॥ ८५ ॥ प्रश्र्न विचारावे ऐसे । जीवन जगावे कैसे? । सुसंगत होईल कैसे? । भगवंतास काय हवेहवेसे? ॥ ८६ ॥ अंतःकरणाच्या ओढीने । होतात गुरूदर्शने । आकर्षितो तळमळीने । नच व्यवहारी धनाने ॥ ८७ ॥ ऐशी भक्त्ती करावी । जेणे गुरूमुर्ती प्रसन्न व्हावी । हीच अंतरिच्छा असावी । गुरूचरणी व्यक्त करावी ॥ ८८ ॥ गुरू जे अंतरंग जाणणार । ते कैसे हजेरीला भुलणार ? । ते कैसे धनाला भुलणार ? । ते खर्या प्रेमाला भुलणार ॥ ८९ ॥ हजेरी नाही महत्वाची । बैठक असावी तळमळीची । ओढ असावी चित्ताची । तेणे वेळ गुरूप्राप्तीची ॥ ९० ॥ जे तळमळीने मिळते । तेच केवळ टिकते । जे मनापासून नसते । ते उघडकीस येते ॥ ९१ ॥ फजितीस कारण होते । गुरूकृपा नष्ट होते । जे असते ते जाते । विठोबाचे जे झाले ते ॥ ९२ ॥ ऐसाच विठोबा घाटोळ । जो राहिला समर्थांजवळ । ढोंग लोभाचे वाढता बळ । गुरूने दूर लोटले तत्काळ ॥ ९३ ॥ जीवनात भाव महत्वाचा । तैसाच बोल अंतरीचा । त्या विठोबा घाटोळाचा । भाव लोभी वृत्तीचा ॥ ९४ ॥ शुद्ध भाव नव्हता साचा । तेणे योग गुरूकृपा नष्टचा । कळस झाला ढोंगीपणाचा । प्रसंग आला फजितीचा ॥ ९५ ॥ महाराजांनी ओळखले त्यास । विठोबा घाटोळ भक्तास । सांगितले कित्येक वेळेस । नको होऊ फजितीस ॥ ९६ ॥ नको अनुसरू ढोंग कधी । करशील एके दिवशी उपाधी । नको करू भ्रष्ट बुद्धि । घालवशील सुवर्णसंधी ॥ ९७ ॥ गुरू स्वभावाने कडक । सोसले प्रसंग अनेक । परी परमार्थात जे बोचक । गुरूस न खपणार एकेक ॥ ९८ ॥ एकदा गुरू निद्रावस्थेस । परगावची मंडळी दर्शनास । हेतु सांगितला विठोबास । वशील्याने जवळ केले त्यासी ॥ ९९ ॥ वशीला जैसा उपयोगी । तैसाच ठरे निरुपयोगी । खरा सत्पुरुष योगी । कधी वशीला न मागी ॥ १०० ॥ ह्याचेच आले प्रत्यंतर । महाराज रागावले फार । विठोबा घाटोळावर । आला प्रसंग अनावर ॥ १०१ ॥ केवढा अनर्थ घडला । विठोबा कायमचा दुरावला । परी गुरूचा ताप गेला । गुरू उपाधीमुक्त झाला ॥ १०२ ॥ महाराज मुळचेच अलिप्त । कैसे होणार लीप्त? । व्यवहारात नि उपाधीत । जे सर्व जन असतात ॥ १०३ ॥ महाराज उपाध्या टाळतात । भाव अंतरीचा जाणतात । जे खरे गुरू असतात । ते ऐसेच वागतात ॥ १०४ ॥ ऐसे समर्थ गजानन । चमत्कृती विलक्षण । थक्क होती जन । सहज धरती गुरुचरण ॥ १०५ ॥ गणामहाराज सांगे । जो शुद्ध अंतरंगे वागे । तेणे न होणार वावगे । होईल त्याच्या मनाजोगे ॥ १०६ ॥ श्रद्धा शुद्धतेचा अभाव । तैशा कृतीस होता वाव । तेणे गुरूप्राप्ती अभाव । गुरूकृपा अभाव ॥ १०७ ॥ तळमळ श्रद्धा जाणून । गुरू करती भक्त रक्षण । शुद्ध अंतरंगाविण । न लाभे गुरू चरण ॥ १०८ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य तृतीयोऽध्यायः संपूर्णः ॥