गणामहाराज नामात । आनंद अनुभवात ।
गण गण गणात बोतेत । महाराज तोषतात ॥
तल्लीन होता नामात । ‘गुरू’ ‘गुरू’ दिसतात ।
पांडुरंग लिहवतात । ओव्या रचल्या जातात ॥
नामाचा भरवतो घास । गणामहाराज सर्वांस ।
गुरूचरण आपणांस । लाभतील हमखास ॥
कर्ता करविता भगवंत । गणामहाराज निमित्त्य ।
स्वानुभवे वदतात । तराल तुम्ही नामात ॥
आम्ही झालो नामाचे नामाचे । आता बोल निश्चयाचे ।
रोज नाम भजायचे । त्यावाचून न झोपायचे ॥
इतुक्या ओव्या वाचता । भयभीती न चित्ता ।
अनुभवीन नाम आता । न भटकणार वृथा ॥
आता नामाचा गजर करा ।
हरी नामाचा गजर करा ॥
हरी हरी हरी हरी । वास कर तू माझ्या घरी ।
भजन प्रत्येक प्रहरी । म्हणेन हरी हरी हरी हरी ॥
विठ्ठल विठ्ठल बोला । जय हरी विठ्ठल बोला ।
माझा विठ्ठल भोळा । रखुमाईसह घराला ॥
दत्त दत्त बोला । गुरूदेव दत्त बोला ।
श्रीपाद श्रीवल्लभ बोला । आनंदी आनंदे बोला ॥
दिगंबरा दिगंबरा । श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ।
भिक्षा मागा माझ्या घरा । दत्त वास माझ्या घरा ॥
दत्ता दिगंबरा या हो । स्वामी मला भेट द्या हो ।
शाश्वती मन रमू द्या हो । मला जीवनी उद्धरा हो ॥
विश्वोद्धारक नाथ माझा । श्री रंग अवधूत ।
दत्त दत्त भजण्यात । दिसे अवधूत ॥
स्वामी समर्थ, स्वामी समर्थ । नाम राहू द्या मुखात ।
आता भेटा क्षणार्धात । नका पाहू माझा अंत ॥
वासुदेवानंदा सखा । तार माझ्या भव दुःखा ।
दत्त नाम माझ्या मुखा । ठेव लेकरा हसतमुखा ॥
विश्वोद्धारक श्रीकृष्णा । नाम छंद लागुद्या मना ।
येता जाताना भजताना । तुलाच पाहीन श्रीकृष्णा ॥
जय जय रामकृष्ण हरी । जय जय रामकृष्ण हरी ।
भजेन तुम्हा नित्य प्रहरी । वास करा माझ्या घरी ॥
रघुपती राघव राजाराम । पतीत पावन सीताराम ।
येता जाता घेता नाम । सर्व स्थळी पाहीन राम ॥
गजानन, गजानन । श्रीसमर्थ गजानन ।
श्रीसमर्थ गजानन । श्रीसमर्थ गजानन ॥
गोपाळा गोपाळा । गजानन बाबा गोपाळा ।
साईबाबा गोपाळा । गजानन बाबा गोपाळा ॥
ॐ नमो सद्गुरू । श्री गजानन बाबा ।
श्री गजानन बाबा । श्री गजानन बाबा ॥
पांडुरंग, पांडुरंग । माझे गुरू पांडुरंग ।
नाम मुखी राहो रोज । लाज राखा माझी रोज ॥
योगेश्वरा योगेश्वरा । माझा बंधु सखा खरा ॥
वास करा माझ्या घरा । भवसागरी उद्धरा ॥
योगेश्वरा झालो तुझा । तेणे प्रपंच झाला तुझा ॥
नाम भजणे छंद माझा । दर्शनाचा योग माझा ॥
योगेश्वरा, पांडुरंगा । तुम्ही जाणा अंतरंगा ॥
जडो आता सत्संगा । शुद्ध भाव अंतरा ॥
योगेश्वर माझा सखा । सदा माझा पाठीराखा ॥
आता न उरे भवदुःखा । तरणार माझी नौका ॥