॥ श्री ॥
अष्टौ प्रहर स्मरणीय माझे गुरू
प. पू. दादा, पांडुरंगशास्त्री आठवले यांसी
शतश: वंदन क्षणाक्षणासी
एकेक अनुभव जो ग्रंथासी
सर्वच अर्पण गुरूचरणांशी
तव कृपेने नामानुभव आनंदराशी
ऐसी कृपा लाभो सर्व भक्तांसी
जैसा गणामहाराज तव चरणांसी
तैसा सुयोग येवो सर्वांसी
- गणामहाराज
गुरूपोर्णिमा
२६ जुलै १९९१
४ अमी अपार्टमेंट, वडोदरा
- नामाविषयी थोडेसे -
1. नाम म्हणजे भगवंताचे नाम, सद्गुरूचे नाम.
2. ह्या नाममहात्म्यातली प्रत्येक ओवी दोन वेळा वाचावी.
3. रोज नित्यनेमाने १४४ ओव्या वाचल्यात तर सात दिवसात १००८ ओव्या वाचून होतील.
4. नाम महात्म्य वाचण्या अगोदर आपले मातापिता, कुलदैवत, कुलदेवता व ज्या देवावर श्रद्धा असेल, मनोमन मानलेल्या गुरूंचे मनोमन स्मरण करावे. मनःपूर्वक वंदन करावे. विवहित स्त्रीने आपल्या पतीचे स्मरण करावे.
5. मला खात्री आहे, माझा आत्मविश्वास आहे की ह्या ग्रंथातील ओव्या वाचल्यावर आपणांस नामाची गोडी व ओढ निश्चित लागेल व दिवसातुन किमान अर्धा तास नामस्मरणासाठी वेळ मिळेल.
6. नामस्मरणास सोळे ओवळे नाही, जातीभेद नाही. एकांत पाहिजेच असे नाही. नामस्मरणास वेळ मिळत नाही, जागा लहान आहे, आजुबाजुस गोंगाट होतो लक्ष लागत नाही, ह्या सबबी लंगड्या ठरतील. प्रपंचातल्या जबाबदार्यांकरता, मनोरंजना करिता जसा आपण वेळ काढता तसाच परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने वेळ काढायचा असतो. सुरुवातीला जड जाते. नंतर आपण नामात रममाण व्हाल. “मला आता सर्व सर्व मिळाले” असे उद्गार काढाल.
7. लक्षात ठेवा - नामात लक्ष ठेवाल तर सभोवताल विसराल.
8. लोभ करायचा झाला तर नामाचा करा. भवसागर तरा.
9. भगवंताचे नाम नितांत श्रद्धेने, कर्तव्यबुद्धीने स्मरावे.
10. प्रपंचात राहुन स्वार्थ परमार्थ साधायचा असेल तर कलीयुगात नामस्मरण उपयुक्त आहे.
11. परमेश्वराच्या नामास काय लागते? आंतरिक ओढ लागते.
12. नामस्मरण नवविधा भक्तीतले सहज, सोपे, बिन पैशाचे, बिन अवडंबराचे, आत्मोन्नती साधण्याचे एक साधन आहे.
13. नामजप करणे महत्वाचे आहे. जप मोजणे महत्वाचे नाही.
14. नामस्मरणाने मन ताजेतवाने प्रसन्न रहाते. मनोबळ वाढते.
15. नामस्मरणामुळे आत्म्याचे बोल ऐकु येतात. हे खरे आहे. हा माझा स्वानुभव आहे.
16. आत्म्याचे बोल ऐकावे. तेच जीवनात हितकारक आहे असे पदोपदी जाणवते. दुर्लक्ष केल्यास, आत्म्याच्या आवाजानुसार कर्माचरण नसल्यास चित्तास शांती लाभत नाही. चित्त अशांत झाल्यास नामजपाला दोष देऊ नका, दोष आपला आहे. “मी” दोषी आहे हे ही अनुभवत आहे. जैसी कर्मे तैसे फळ । करता आदेश पालन । लाभे शांती समाधान ॥
17. गुरू न कधी शोधावा । ऐसा नामजप करावा । गुरू स्वयेच घरी यावा ॥ ऐशी हाक मारावी, परमेश्वराने, सद्गुरूंनी ऐकावी. ईश्वरीकृपेमुळे दोन्ही अनुभवले. हा नामस्मरणाचा प्रभाव.
18. नामस्मरणात गुरूदर्शन, गुरूभेट, संभाषण योग येतात. सातत्य महत्वाचे आहे. १) अवलीया, समर्थ श्रीगजानन महाराज (शेगांव), २) प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले (तत्वज्ञान विद्यापीठ) दादा, ३) श्रीपाद श्रीवल्लभ, ४) श्री रंग अवधूत महाराज (नारेश्वर), ५) श्री वासुदेवानंद सरस्वती (गरुडेश्वर), ६) श्री अक्कलकोट स्वामी ह्यांचेशी मानसपूजेत दर्शने, संभाषणे अनुभवली आहेत. ह्या थोर विभूतींच्याच कृपेने सरस्वती, गणपती व श्री गुरुदेव दत्तात्रय दर्शन, संभाषण योग प्राप्त झाले आहेत. ज्या नामामुळे थोर विभूतींची कृपा लाभली ऐशा नामाला कैसा विसरू? एक लिहावेसे वाटते. प. पू. भुराजी महाराज (दारव्हा, महाराष्ट्र) ह्यांची भेट व प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांची प्रत्यक्ष भेट अवर्णनीय आहे. तसेच फकीराच्या रूपात श्रीशीरडीचे श्रीसाईबाबा ह्यांचे दर्शन अवर्णनीय आहे. ही माझी अत्मस्तुती नाही, ही नाममहती आहे.
19. नामात माणुस निर्भीड, निर्भय होत असला तरी अहंकारयुक्त जगू नये, तसे जगल्यास रावणासारखी गत होते. स्मरावा दशरथाचा राम मनी । नको नको दशानन मनी ॥
20. आपलेच दोष कळण्यासाठी । नाम येऊद्या मुखावरती ॥
21. “तो” “मी” नसे वेगळा, नामात होते प्रचिती, आपण अनुभवावी ती.
22. जशास तसे न वागावे । हेच नामस्मरणात शिकावे ॥
23. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापावेतो नामस्मरण सलंग (सतत) सात दिवस करणे प्रपंचात राहुन सहज शक्य आहे. प्रतीवर्षी एक नामसप्ता करावासा वाटेल हाही प्रयोग करण्यासारखा आहे. गुरूकृपेने मी अनुभवले आहे, आनंद अवर्णनीय आहे.
24. तिसर्या नामसप्त्यात गुरूवार २५ जुलै १९८५ रोजी दुपारी १२ वाजता श्रीपाद श्रीवल्लभांनी दर्शन दिले, भिक्षा मागितली. आसनारूढ झाले. पूजा व नैवेद्याचे ताट स्विकारते झाले व त्याच सुमारास मला, म्हणजे श्रीकांत यशवंत फडके ह्यांस, सांगितले की आज ज्या आसनावर तू नामजप करत आहेस त्याच आसनावर (एक दोन दिवसात) तुझे गुरू तुला बसलेले दिसतील खरे ठरले. ता. २७ जुलै १९८५ रोजी शनीवारी प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले उर्फ प. पू. दादा माझ्या घरी आले व त्याच आसनावर बसून कृपाशिष देते झाले. नामजप आसन सिद्ध झाले. गुरूवारी ता. २५ जुलै १९८५ रोजी श्रीपाद श्रीवल्लभांनी श्री गजानन महाराजांस विचारले की तुझ्या भक्ताचे आध्यात्मिक नाव काय ठेवायचे? तेव्हा महाराज म्हणाले की हा सारखा येता जाता “गण गण गणात बोते” म्हणतो, सदा माझाच मंत्रजप करत असतो म्हणुन “गणामहाराज”. श्रीपाद श्रीवल्लभ “तथास्तु” म्हणाले. मी नामजपात असताना माझा देह क्षणभर अदृष्य करून माझे बालस्वरूप केले. नामकरण विधी केला. माझ्या कानात भक्तीची सुंकले घातली व म्हणाले बाळ रडु नकोस. ह्या सोहळ्यास श्रीपाद श्रीवल्लभ, श्री गजानन महाराज, श्री रंग अवधूत महाराज व श्री साईबाबा हजर होते. त्याच वेळी माझ्या बालस्वरूपाला श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीष प्राप्त झाले. जेव्हा गुरू येईल तुझ्या घरी ।सरस्वती नाचेल जीभेवरी ।लक्ष्मी विष्णु लोळतील तुझ्या घरी ।नको करू नोकरी ।नको करू व्यापार ।कर तू भक्तीचा प्रचार ।घरोघरी ॥त्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांनी माझ्या घरातून एक कागद व लेखणी मागवली, ती लेखणी मी हातात घेतल्यावर माझ्या हातुन नामावर ओव्या रचल्या गेल्या. एक झलक दाखविली व म्हणाले की आता पुढचे कार्य तुझे गुरू येतील तेव्हा होईल. गुरूभेटीत काव्यशक्ती जागृत होईल. तंतोतंत खरे ठरले. केव्हाही प. पू. दादांचे स्मरण करून लिहावयास बसलो की लेखणी सरसर चालते. ओव्या रचल्या जातात. दादाच लिहवतात असे जाणवते. हा गुरूकृपेचा प्रभाव.
25. ऑक्टोबर १९८८ ते फेब्रुवारी १९९० पर्यंत जेव्हा जेव्हा नामस्मरण झाले त्या नामस्मरणात व गुरूवारच्या नामजप सेवेत माझ्या गुरूंनी, प. पू. दादांनी, माझ्या हातून ज्या काही नामावर ओव्या लिहवून घेतल्या त्या सर्व एकत्रित करून आपणास सादर करीत आहे. ह्या ओव्या लिहिताना माझ्या हातून चुका झाल्या आहेत. कृपया आपण त्या सुधरवाव्यात अशी कळकळीची विनंती आहे. मी मूढ अज्ञानी आहे.
26. प. पू. दादांच्या प्रेरणेमुळे, आशिर्वादामुळे ह्या ग्रंथाचे नाव गुरू प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित “नामानुभव” आहे.
27. नामस्मरणात आपणांस सद्गुरू, देवदेवतांची दर्शने, संभाषण योग लाभोत हीच सदीच्छा.
28. नामस्मरण करताना भगवंताशी नाते जोडले जाते.
29. आपण भेटू नामस्मरणात । तेणे नाम येऊद्या मुखात ॥