॥ श्री गजानन महाराज प्रसन्न ॥
॥ श्री आठवले गुरू प्रसन्न ॥
गुरुवार, १४ जून १९९०.
नको लालसा द्रव्याची । जी निकामीच ठरायची ।
द्रव्याने तुंबडी भरायची । सोय जिवंत मरणाची ।
दुराचारे कमवायची । मनःशांती भंग व्हावयची ।
पर द्रव्य हिरावण्याची । गणा सांगे वेळ मरणाची ॥ १ ॥
नको द्रव्य लालसा फार । लालसेत न कधी तरणार ।
द्रव्या लालसाच जाळणार । तिच सदा होरपळणार ।
जो द्रव्य लालसेत रहाणार । आसक्ती भावात जगणार ।
बाळगुन काय मिळवणार ? । गणा सांगे सर्वच गमावणार ॥ २ ॥
द्रव्य किती कमवावे ? । प्राक्तनावर सोपवावे ।
आहे त्यात संतुष्ट व्हावे । समाधानी वृत्तीने जगावे ।
परमार्थी धन खर्चावे । स्वकष्टे जे मिळवावे ।
ऐसे द्रव्य कमवावे । गणा सांगे निवांत झोपावे ॥ ३ ॥
नका जाळु चित्तास । द्रव्य हव्यास पूर्तीस ।
निकामे समजावे त्यास । जे दूर लोटे शांतीस ।
इतुके जवळ करा त्यास । उपयुक्त मनःशांतीस ।
द्रव्याचा संपता हव्यास । गणा सांगे शांती त्यास ॥ ४ ॥
नका हिरावु परद्रव्य । नको त्यात वेळ व्यय ।
परद्रव्य अक्षय । तेणे शांतीचा क्षय ।
कधी न तुम्ही निर्भय । काळाचे सदा भय ।
रहाता नाममय । गणा सांगे निर्भय ॥ ५ ॥
द्रव्य लालसे करता । नका जगु त्याकरता ।
द्रव्य चिंतन येताजाता । लोभ बळावे येता जाता ।
अतीलोभ त्याचा होता । सर्व द्रव्यातच मोजता ।
अतीलोभ जाळे चित्ता । गणा सांगे ठसवा चित्ता ॥ ६ ॥
नको द्रव्याचे मानकरी । तेणे व्हाल अहंकारी ।
अहंकाराची येरझारी । शांती भंग सदा करी ।
द्रव्य सारे संपल्यावरी । चिंता काळजीच उरी ।
नाम येऊद्या मुखावरी । गणा सांगे नामच उद्धरी ॥ ७ ॥
द्रव्य लालसे जगता । पूर्ती साठी भटकता ।
पापाची बीजे पेरता । पापफळेच चाखता ।
कटुता अनुभवता । लालसा दूर लोटता ।
नाम भजा येता जाता । गणा सांगे त्या करिता ॥ ८ ॥
पैसा अडका बेताचा । नको मार्ग हव्यासाचा ।
पोटापुरते जगण्याचा । तेणे योग हरीनामाचा ।
मार्ग सदा हव्यासाचा । घात मनःशांतीचा ।
गणा सांगे हरीनामाचा । मार्ग पैलतीराचा ॥ ९ ॥
नको लोभ द्रव्यावरी । लोभाने शांती जाते दूरी ।
शांतीस लोटल्यावरी । काय रहाणार उरी ? ।
अशांती असता उरी । नाना क्लुप्त्या आचरी ।
गणा सांगे आजवरी । कुणी न उद्धरले संसारी ॥ १० ॥
किती पैसा कमवावा ? । त्यात जीव रमवावा ।
जाळण्या इतुका नसावा । पेलण्या इतुका असावा ।
प्रपंचा पुरता नसावा । परमार्थी खर्च व्हावा ।
गणा सांगे चित्ती ठसवा । धर्माचरणे द्रव्य कमवा ॥ ११ ॥
द्रव्याच्या मागे पडता । हव्यासात अडकता ।
नकळत दास होता । त्याची जी जी करता ।
अशांतीनेच जगता । जीव बेजार करता ।
गणा सांगे त्याकरिता । नामच जीवनी त्राता ॥ १२ ॥
नको द्रव्याचेच मानकरी । कुणी न तरले आजवरी ।
लोभाची बीजे पेरल्यावरी । लोभाची फळे उदरी ।
तीच खाता वरचेवरी । लोभ बळावतो भारी ।
गणा सांगे आजवरी । नाना यातना अंतरी ॥ १३ ॥
मी नि माझ्याकरिता । किती हव्यास करता ! ।
अशाश्वतीतच रमता । त्याच्याच मागे पडता ।
पूर्ततेसाठी धांवा करता । कोण ठरे तुम्हां त्राता ? ।
गणा सांगे ठसवा चित्ता । शाश्वतच खरा त्राता ॥ १४ ॥
द्रव्य कितीही कमवता । तेणे न शांती चित्ता ।
अशांत मने जगता । केवळ हव्यासाकरता ।
द्रव्यात इतुके धुंद होता । हव्यास जाळतो, विसरता ।
अंतरात्म्यास ऐकता । गणा सांगे शांतीने जगता ॥ १५ ॥
किती कमवावे आपण ? । हे ही न जाणता आपण ।
द्रव्याचे संपता इंधन । प्राप्तीसाठी ज्वलन ।
केवळ द्रव्याने जीवन । कधी न परीपूर्ण जीवन ।
गणा सांगे नामस्मरण । ठरते तरण्या जीवन ॥ १६ ॥
द्रव्याचा फाजील साठा । फाजील जगण्या करता ।
बेताचे द्रव्य असता । नामस्मरणी रमता ।
फाजीलपणे मिळवता । फाजीलपणे घालवता ।
गणा सांगे त्याकरिता । नको त्याचा फाजील साठा ॥ १७ ॥
द्रव्यच न कमवता । त्यासाठी जीवन जाळता ।
काय मिळते ? पुसा चित्ता । मनःशांती मिळवता ।
नामावर सोपवता । नामच जीवनी त्राता ।
गणा सांगे त्या करिता । संत बोल आठवा आता ॥ १८ ॥
नका होऊ धुंद द्रव्यात । कुणी न तरले त्यात ।
हव्यासाच्या जाळ्यात । नका गुरफटु त्यात ।
जीव बेजार करण्यात । काय मिळवता त्यात ? ।
गणा सांगे रहावे नामात । वागावे त्याचे आदेशात ॥ १९ ॥
नको तुलना द्रव्याची । ऐशा मार्गे जगण्याची ।
तुलना घातक ठरायची । वेळ इमले कोसळण्याची ।
परद्रव्य हिरावण्याची । वेळ जिवंत मरण्याची ।
गणा सांगे संत बोलाची । कीमया जीवन जगण्याची ॥ २० ॥
- गणामहाराज