॥ श्री गजानन महाराज प्रसन्न ॥
॥ श्री आठवले गुरू प्रसन्न ॥
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ धृ ॥
प्रातःस्मरणी समुद्रवसने
आरंभावा दिन कराग्रेवसने
प्रसन्न भावे प्रसन्न मनाने
स्वागत प्रसन्न चित्ताने
उषःकालचे स्वागत करणे
चहा / कोफी मनोभावाने
रात्रीचा आनंद स्मरणे
निशदिनी पतिदेव पूजणे
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ १ ॥
सासू सासरे तात-जननी
शब्द झेलावे क्षणोक्षणी
सदैव आज्ञा पालन करुनी
घे तू मर्जी संपादुनी
आशिर्वचने उघळुनी
संतुष्ट होतील जीवनी
ती सुमने एक एक वेचुनी
जावे जीवनी उद्धरुनी
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ २ ॥
दीर नणंदा - बंधु भगिनी
ऐसा भाव राहु दे मनी
चुलत्यांस सख्खे मानुनी
नको भेदभाव कधी मनी
एकेकाची कळी खुलवुनी
मायेचा वृक्ष बहरो सदनी
प्रेमभाव, सात्विक वर्तनी
प्रकटो जे जे अंतःकरणी
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ ३ ॥
तुझे घर माहित नव्हते
लिहिले होते जे ललाटे
माहित होता ओढ लागते
सुक्षणाची वाट बघते
माहेरचे जे जे होते
सासरात मिसळणार ते
माहेर सासर नको भेद ते
राहु दे केवळ नावापुरते
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ ४ ॥
काय शिकवण मातेची
सुसंस्कृत शालीनतेची
प्रेमभावे आतिथ्याची
नाती गोती जिव्हाळ्याची
हंसत मुखे स्वागताची
कसब कुशलता मातेची
संवय तुला अनुभवाची
मातेच्या मार्गदर्शनाची
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ ५ ॥
स्वयंपाक करावा रुचकर
भोजन वेळच्या वेळेवर
हंसरे भाव चेहेर्यावर
तृप्तीची यावी ढेकर
असावा चौरस आहार
आरोग्यास तो हितकारक
आग्रह करून वाढल्यावर
जेवणारा तृप्तच होणार
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ ६ ॥
पिता तुझे सुसंस्कारी
सात्विकावर जोर भारी
रघुनंदन सदा स्मरी
रघुवीर समर्थ प्रेमे भारी
श्रीधर स्वामी अंतरी
अंतरीचे बोल उच्चारी
सज्जनगडाची ओढ भारी
सज्जनगडच माहेरी
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ ७ ॥
काय शिकवण पित्याची
समर्थ दासबोधाची
जीवन जगुन अलीप्त रहायची
शिकवण उच्चकोटीची
संसार करून परमार्थाची
ओढ असावी चित्ताची
समर्पण भावात जगण्याची
परी लाचारी न पत्करायची
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ ८ ॥
बंधु तुझा मुकंदा ऐसा
गणेश कृपेचाच ठसा
सिद्धिविनायका विश्वासा
म्हणे त्यावर ठेवा भरवंसा
सुखकर्ता माझा गणेशा
विघ्नहर्ता माझा गणेशा
प्रारब्ध भोग सुसह्य कसा
तुझ्या बंधुस अनुभव जैसा
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ ९ ॥
चातुर्मास सणवार
धार्मिकतेवर ठेव भार
धर्माचरणे असल्यावर
त्याची मर्जी आपल्यावर
नको भार स्तोमावर
नको तो अवडंबरावर
अंतरीच्या शुद्धतेवर
त्रिमूर्ती संतोषणार
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ १० ॥
एकेक पाऊल उचलताना
नको विसरू शालीनपणा
क्षणिक उच्छृंखलपणा
कठीण तोल सावरण्या
नको जीवनी क्लीष्टपणा
जीव जाळणे क्षणाक्षणा
जीवन वृक्ष जोपासण्या
मायेचा ओलावा क्षणाक्षणा
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ ११ ॥
विविध पदार्थ भोजनात
अत्यावश्यक आहारात
सर्वच सुरस होण्यात
जिंकशील तू संसारात
कालमान पाहुन स्वयंपाकात
फेरफार करावे त्यात
पाकशास्त्री निपुण होण्यात
अन्नपूर्णा हवी घरात
माधवी तू माहेरवाशीण
होणार सासुरवाशीण ॥ १२ ॥
- श्रीकांत य. फडके
- सोमवार १४ मार्च १९९४