॥ श्री गजानन महाराज प्रसन्न ॥
॥ श्री आठवले गुरू प्रसन्न ॥
गुरुवार, १ मार्च १९९०.
(येथे पांडुरंग म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले)
पांडुरंग पांडुरंग । तुझ्या नामात दंग ।
तेणे घडे सत्संग । शुद्ध अंतरंग ॥
पांडुरंग नामात । जीव रमु दे त्यात ।
येता जाता भजण्यात । भाव राहु दे मनात ॥
पांडुरंग मुखे वदता । प्रपंच ताप न चित्ता ।
येता जाता भजता । स्वस्थता अनुभवता ॥
नाही आनंद विषयात । आनंद आहे नामात ।
पांडुरंग जयघोषात । विषय दूर जातात ॥
पांडुरंग पांडुरंग । येता जाता पांडुरंग ।
ऐसे नामात होता दंग । येता जाता सत्संग ॥
पांडुरंग सहाय्यभूत । पांडुरंग उपयुक्त ।
तेणे राहु दे नामात । हीच इच्छा मनात ॥
ज्या ज्या स्थळी जाईन । पांडुरंगच पाहीन ।
येता जाता होवो भजन । पांडुरंगी सदा लीन ॥
माझी भूक तहान । पांडुरंगे तोषवीन ।
नामात दंग होऊन । तेणे संतुष्ट होऊन ॥
पांडुरंगा आळवीन । येता जाता नामस्मरण ।
ऐसी हाक मारेन । पांडुरंग येईल धावुन ॥
पांडुरंगावर विश्वास । प्रचिती आली मनास ।
त्याला हाक मारल्यास । उद्धरणार हमखास ॥
पांडुरंगाच्या नामात । आनंद जडला त्यात ।
येता जाता भजण्यात । आनंदी आनंद मनात ॥
पांडुरंगाच्या नामाने । प्रसन्नता खात्रीने ।
जगु आत्मविश्वासाने । पटते अनुभवाने ॥
पांडुरंगा माझ्या सदना । लाभु द्या गुरुचरणा ।
माझा मनोध्यास जाणा । त्वरीत तुम्ही आणा ॥
पांडुरंगा तुझ्याविण । नाही गुरुचरण ।
तुझे स्मरण करीन । गुरू पादुका मिळविन ॥
पांडुरंगा तुझ्या नामात । अत्यंत विश्वसलो त्यात ।
काव्य शक्ती लाभण्यात । खरा उपयुक्त त्यात ॥
पांडुरंगा माझे ऐका । नीट कान देऊन ऐका ।
धाडा चांदीच्या पादुका । गजा अवलीयाच्या ॥
पांडुरंगा तूच धाव आता । जाण माझी मनोव्यथा ।
गुरू पादुका मागता । काय गुन्हा झाला सांगता! ॥
पांडुरंगाच्या नामात । खरा स्वाध्याय त्यात ।
पांडुरंग स्मरणात । खरे खुरे ज्ञान त्यात ॥
पांडुरंग पांडुरंग । सर्वात दिसे पांडुरंग ।
तुझ्या रूपात होता दंग । सर्वकाळी सत्संग ॥
पांडुरंगा तुझ्यावर । प्रपंच सोपवणार ।
तुझेच नाम भजणार । मनःशांतीने जगणार ॥
पांडुरंगा पांडुरंगा । काय करू सांगा ।
म्हणता विषय त्यजा । कैसे त्यजु सांगा ॥
पांडुरंगा तुझ्या नामात । जरी मी दंग त्यात ।
वृत्ती सतावतात । परावृत्त करतात ॥
येता जाता पांडुरंगात । वेळेचे न भान त्यात ।
कर्तव्यकर्मे न होतात । नको दोष मला त्यात ॥
पांडुरंगा! आजवर । विश्वासलो तुझ्यावर ।
तुच मला तारणार । पुन्हां पुन्हां हांक मारणार ॥
पांडुरंगा तुझ्या नामात । काय न मिळे त्यात ।
भिकारी येता दारात । संतुष्टतो चित्तात ॥
पांडुरंगा तुझ्या नामात । सर्व सर्व आहे त्यात ।
स्त्रीसुखापेक्षा जास्त त्यात । आहे पांडुरंगात ॥
पांडुरंग माझा सखा । जाणतो माझ्या दुःखा ।
नामात तरशील लेका! । येता जाता सांगे सखा ॥
पांडुरंग आत्मसुख । जाळतो भवदुःख ।
शांतीचा मार्ग एकेक । दावतो एक एक ॥
पांडुरंग पांडुरंग । तुझ्या नामात झालो दंग ।
सदा जडो सत्संग । जाण माझे अंतरंग ॥
पांडुरंग ऐसे नाम । सत्संगाचे धाम ।
येता जाता भजता नाम । साधुसंत मुक्काम ॥
पांडुरंगा राखा लाज । भजन केले तुझे आज ।
माझी राखण्यात लाज । तुझीच राहील लाज ॥
पांडुरंगा मी अज्ञानी । मंदमती अवगुणी ।
तू तर गुणी, ज्ञानी । नामात साधेन दोन्ही ॥
पांडुरंगा तुझ्या नामात । अमर्याद ज्ञान त्यात ।
येता जाता भजण्यात । ज्ञानी होऊन जगण्यात ॥
पांडुरंग नामात । अंतर्मुखे जगण्यात ।
आपलेच दोष कळतात । येता जाता भजण्यात ॥
नको दोष दुसर्याचे । दोष पहावे स्वतःचे ।
दूर करणे हीताचे । पांडुरंग बोले वाचे ॥
पांडुरंगाच्या नामात । दृष्टीदोष कळतात ।
स्वयेच जागृत होण्यात । अनेक फायदे त्यात ॥
- गणामहाराज